पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मुळे ऑल इंडिया रेडिओने १० कोटींची कमाई केली आहे. मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये ‘मन की बात’च्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओने केलेल्या कमाईची माहिती लोकसभेत देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मधून ऑल इंडिया रेडिओने २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५.१९ कोटींची, तर २०१५-१६ मध्ये ४.४८ कोटींची कमाई केली आहे.

बुधवारी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या संदर्भातील माहिती लोकसभेत दिली. ‘पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत ३३ वेळा मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम १८ प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. याशिवाय इंग्रजी आणि संस्कृत भाषांमध्येही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते,’ अशी माहिती राठोड यांनी लोकसभेला दिली. ‘पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून देशवासीयांपर्यंत पोहोचतो. तर इंटरनेटच्या माध्यमातून हा कार्यक्रम जगभरातील लोक ऐकतात,’ असेदेखील त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑक्टोबर २०१४ पासून मन की बात करण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी देशातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी त्यांच्या भावना व्यक्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून रोजी देशवासीयांशी ‘मन की बात’मधून संवाद साधला होता. यादिवशी आणीबाणीला ४२ वर्षे पूर्ण झाली होती. ‘आणीबाणी लादण्याचा निर्णय ज्या दिवशी घेण्यात आला, तो दिवस भारतासाठी काळा दिवस होता,’ असे पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या एखाद्या रविवारी मन की बात करतात. या माध्यमातून देशातील महत्त्वाच्या घटनांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतात. यासोबतच देशातील अनेक सणांनिमित्त मोदी या कार्यक्रमातून शुभेच्छा देतात. याशिवाय चांगले काम करणाऱ्या अनेकांचा उल्लेख करत मोदी त्यांचे कौतुकदेखील मन की बातमधून करतात.