पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर पाकिस्तानसह अनेक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींनी बलुचिस्तानातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात वाचा फोडल्यानंतर बलुची नागरिकांना मोदींचे आभार तर मानलेच शिवाय बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहनही केले जात आहे. आता बलुची नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून ऑल इंडिया रेडिओने (एआयआर) बलुची भाषेत कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एआयआरच्या वतीने बलुची भाषेत एक बुलेटिन सुरू होण्याची शक्यता असल्याचे प्रसारभारतीच्या सूत्रांनी माहिती दिली. या प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.
बलुची नागरिकांनी पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यासाठी मदत मागितली असून जर्मनी शहरात बलुची समर्थकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.