संसदेच्या अधिवेशनाचा निम्मा कालावधी गदारोळामुळे वाया गेला आहे. यातून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र त्यापूर्वी सरकार व काँग्रेस दरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
विरोधकांची नकारात्मक व अडथळे आणण्याची मानसिकता असल्याचा आरोप सरकारने केला आहे. सभागृह चालवण्यासाठी सरकार गंभीर नसल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. संसदेतील कोंडीला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले. त्यांच्या हेकेखोरपणाने चर्चा होऊ शकली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे. चर्चेत गरज भासल्यास पंतप्रधान हस्तक्षेप करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जीएसटी विधेयक अडवून धरण्यासाठी काँग्रेस व्यत्ययाची भूमिका स्वीकारत असल्याचा आरोप अरुण जेटली यांनी केला. यापूर्वीच्या यूपीए सरकारने मान्य केलेल्या जीएसटी विधेयकात सध्याच्या सरकारने महत्त्वाचे बदल केलेले नाहीत. काँग्रेसने घोटाळ्यांच्या मुद्दय़ावरून भाजपची कोंडी असताना भाजपनेही काँग्रेसच्या खेळीला उत्तर दिले आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे.
राजकीय कारणांसाठी काँग्रेस पक्ष सरकारवर नाराज असू शकतो. मात्र नकारात्मक मानसिकतेवरून त्यांनी गंभीरपणे आत्मपरीक्षण केले पाहिजे. कामकाजात अडथळे आणण्याच्या प्रवृत्तीमुळे अर्थव्यवस्था तसेच देशाला फटका बसत आहे.
– अरुण जेटली, अर्थमंत्री

सत्ताधारी मंत्र्यांकडून दिली जाणारी विधाने पाहता सरकारच संसदेतील कोंडी फोडण्यास गंभीर नाही .
आनंद शर्मा, काँग्रेस नेते

‘..तर भत्तेही नाहीत’
संसदेत गदारोळ सुरू असल्याने विशेष काम झालेले नाही. काम झाले नाही तर भत्ते देऊ नयेत अशी सूचना केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केली आहे. सरकार या योजनेवर विचार करत असून, सहमतीसाठी विरोधकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.