भलेही आम आदमी पक्ष दोनेक वर्षांपूर्वीचा असेल; पण राजकीय मुत्सद्देगिरीत ‘आप’ने भाजपला पळता भुई थोडी केली आहे. निवडणुकीत मतदान किती होईल, कुणाला किती टक्के मतं मिळतील, भाजपची सत्ता येईल अथवा नाही, यापेक्षाही दिल्ली विधानसभेची निवडणूक गाजत आहे, ती केवळ सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमुळे! प्रस्थापित – म्हणजे काँग्रेस-भाजपच्या मतलबी कारभारामुळे दिल्लीच्या समस्या वाढत राहिल्या. अवैध वस्त्या असू द्या नाहीतर वाढीव वीजदर, भाजप-काँग्रेसचे हितचिंतक असलेल्या उद्योजकांविरोधात ‘आप’ने मोहीम उघडली आहे. निवडक उद्योजक घराण्यांनी देशाचे वाटोळे केल्याचा आरोप आप नेते करतात. दिल्लीच्या विजेचा झटका इतका मोठा आहे की, भाजप व काँग्रेसदेखील एक पाऊल मागे आले आहे.
निवडणूक प्रचाराच्या आगीत आम आदमी पक्षाने पाणी ओतले नि ही आग अजूनच भडकली. दिल्लीकरांना पाणीपुरवठा करण्यात गेल्या दहा वर्षांत तीस हजार कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आपच्या पाणी श्वेतपत्रात आहे. पाणी योजना दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदारांचे भले करणाऱ्या दिल्लीतील महापालिकांविरोधात ‘आप’ने प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे वीज-पाण्यावरून प्रश्न विचारणाऱ्या जनतेला काय उत्तर द्यावे, या संभ्रमात भाजप आहे. बरं सभेला गर्दीच होत नाहीये! मागील विधानसभा निवडणुकीत चाळीसेक सभांचा रतीब घालणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या सभेला दोनशे लोकांची ‘गर्दी’ असते. तसंही स्वराज यांना भाजपमध्ये ‘परराष्ट्र’ वागणूक देत आहेत. असो. त्यात भर त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीची पडल्याने आता स्वराज यांच्या सभा दिल्लीत होतील की नाही, याचीही खात्री नाही. असो. मूळ प्रश्न आहे पाण्याचा! आप नेत्यांच्या आरोपांना कसे उत्तर द्यावे, या संभ्रमात भाजप नेते आहेत. त्यामुळे म्हणे अमित शहा यांनी प्रदेशस्तरीय नेत्यांकरवी महापालिकेत वर्षांनुवर्षे मलिदा खाणाऱ्या भाजप नगरसेवकांना निरोप पाठवला आहे. लवकरात लवकर ‘आप’च्या पाणी श्वेतपत्रिकेतील आरोपांना प्रत्युत्तर द्या. याला म्हणतात पाण्यासारखा पारदर्शी कारभार!  
पाण्यावरील श्वेतपत्रिकेची तशी प्रसारमाध्यमांनी दखल घेतली नाही म्हणा! मोदी पंतप्रधान झाल्यापासून सरकार प्रसारमाध्यमांना पाण्यात पाहू लागले आहे. असो. ही परिस्थिती माध्यमांनीच ओढवली. तर पाणी श्वेतपत्रिका. ही श्वेतपत्रिका घराघरांत पोहोचवली जाणार आहे. वीज संकटासाठी सरकारशी संगनमत करणारे एक उद्योगघराणे तर जलमाफियांना पोसणारी महापालिका स्तरावरील यंत्रणा- अशांवर केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी वार केला. कोण म्हणतं- आग भडकवण्यासाठी तेल पाहिजे. इथे आगीत पाणी ओतले तरी इतका भडका उडाला!
-चाटवाला