मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद
देशात प्रथमच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बहुतांश न्यायाधीशांनी उन्हाळ्यात महिनाभराची पूर्ण सुटी न घेता त्यातील पंधरा दिवस काम करण्याची तयारी दर्शवली आहे. खटले मोठय़ा प्रमाणावर प्रलंबित असल्याने ते निकाली काढण्यासाठी उन्हाळी सुटी निम्मीच घेऊन आम्ही काम करू, असे त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ७९ पैकी ६८ विद्यमान न्यायाधीशांनी उन्हाळी सुटीतही निम्मे दिवस काम करणार असल्याचे सांगितले आहे; त्यात लखनौ पीठाच्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी १ ते ३० जून ही उन्हाळी सुटी प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्यात फौजदारी खटल्यांमधील अपीलांचा समावेश आहे. यातील आरोपी अनेक वर्षे तुरूंगात आहेत. सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रलंबित खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती व न्यायव्यवस्थेतील रिकामी पदे भरण्याची मागणी केली होती व बोलता बोलता त्यांना रडू कोसळले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी महिन्याच्या सुटीतील पंधरा दिवस खटले निकाली काढण्यासाठी देण्याचे मान्य केले आहे. त्यात काही विशेष सुनावण्याही घेतल्या जातील व त्यामार्गाने खटल्यांचा अनुशेष कमी केला जाईल.
उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की, मुख्य न्यायाधीशांनी खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सुटीत काम करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे तो आम्हाला मिळाला आहे व त्यात वकिलांकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.