भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आलोक जोशी यांची ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली असून ‘इंटेलिजन्स ब्युरो’ अर्थात भारतीय गुप्तवार्ता विभागाच्या संचालकपदी सईद आसिफ इब्राहिम यांची नियुक्ती होत आहे. विशेष म्हणजे ‘आयबी’ची सूत्रे प्रथमच एका मुस्लीम अधिकाऱ्याकडे जात असून चारजणांना डावलून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने अंतर्गत वादही उफाळण्याची शक्यता आहे.
आलोक जोशी हे १९७६ सालच्या हरयाणा बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी हरयाणा पोलीस तसेच ‘आयबी’मध्ये विविध पदांवर काम केले आहे. नेपाळ आणि पाकिस्तानातही त्यांनी काही कामगिऱ्या पार पाडल्या आहेत. ‘रॉ’ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी भारतीय गुप्तचर संघटना असून संजीव त्रिपाठी हे आजवर तिच्या प्रमुखपदी होते.
आसिफ इब्राहिम हे १९७७ सालच्या मध्यप्रदेश कॅडरचे पोलीस अधिकारी आहेत. ५९ वर्षीय इब्राहिम हे निश्चल संधू यांच्याकडून ३१ डिसेंबर रोजी ‘आयबी’ संचालकपदाची सूत्रे स्वीकारतील. आर. एन. गुप्ता, व्ही. राजगोपाल, यशोवर्धन आझाद आणि एस. जयरामन हे चार अधिकारी इब्राहिम यांच्यापेक्षा ज्येष्ठ असताना त्यांची सेवाज्येष्ठता डावलून इब्राहिम यांची नियुक्ती होत आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने त्यांची निवड केली आहे.
इब्राहिम हे गेली तीन दशके आयबीसाठी कार्यरत होते. काश्मीर, नक्षल दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. माधवराव शिंदे आणि मुफ्ती महम्मद सईद यांचे स्वीय सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका मुस्लीम अधिकाऱ्याची ‘आयबी’ प्रमुख म्हणून नियुक्ती होत आहे.