ऑनलाईन ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी कंपन्या कायमच नवनवीन शक्कल लढविताना दिसतात. शिओमी कंपनीचे मोबाईल फोन हे केवळ ऑनलाईन उपलब्ध आहेत. साधारणतः मंगळवारी हे फोन ऑनलाईन उपलब्ध होतात आणि अवघ्या काही मिनिटात खरेदीसाठी नोंदणी होऊन ते संपतातही. उद्या (मंगळवार २३ मे रोजी) अॅमेझॉन इंडियाने या फोनच्या खरेदीवर भारतीयांना काही खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

मंगळवारी २३ मे रोजी शिओमी रेडमी नोट ४ फोन ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हा मोबाईल ग्राहकांना अॅमेझॉन आणि एमआय डॉट कॉमवर खरेदी करता येतो. येस बॅंकच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाव्दारे या फोनची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रेडमी नोट ४ च्या खरेदीवर ५०० रुपयांची कॅशबॅक ऑफर अॅमेझॉनने दिली आहे. याबरोबरच रेडमीचे ओरिजनल ४९९ रुपयांचे कव्हर ३० टक्के सवलतीने ३४९ रुपयांना घेता येणार आहे.

याबरोबरच गोआयबीबो या साईटव्दारे प्रवासाची तिकिटे आरक्षित करणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा फायदा होणार आहे. यामध्ये ऑनलाईन शिओमी खरेदी केलेल्यांना एक कोड मिळणार आहे. या कोडचा वापर करुन देशांतर्गत प्रवासासाठी ४५०० किंवा त्याहून अधिक रुपयांचे तिकिट काढल्यास ५०० रुपये सूट आणि ४००० रुपयांच्या हॉटेल बुकींगवर २५०० रुपयाचे हॉटेल व्हाऊचर मिळणार असल्याचे अॅमेझॉनने जाहीर केले आहे.

याशिवाय वोडाफोन कंपनीनेही शिओमी कंपनीचा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४५ जीबीचा ४ जी डेटा देणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी वोडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांकडे फोनमध्ये किमान १ जीबी डेटा असणे किंवा पोस्टपेड ग्राहकाचा १ जीबीचा प्लॅन असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील ५ महिने दर महिन्याला ९ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

त्यामुळे मोबाईल फोनच्या कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा चालू असतानाच अशाप्रकारच्या ऑनलाईन ऑफर्सही ग्राहकांना भुरळ घालण्यात कुठेच मागे नाहीत.