अमेरिकेचे मत
भारत व पाकिस्तान या देशांनी एकमेकांशी थेट चर्चा करून तणावाची स्थिती दूर करावी व त्यामुळे दोन्ही देशात व्यावहारिक पातळीवर सहकार्य सुरू होण्यास मदत होईल असे अमेरिकेने म्हटले आहे. द्विपक्षीय चर्चा आता यापुढे बंद करण्याचे पाकिस्तानने जाहीर केल्याच्या मुद्दय़ावर अमेरिकेने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी शांतता प्रक्रिया थांबवण्यात येत असल्याचे वक्तव्य केले होते त्यावर विचारले असता अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे
प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान यांच्यातील सहकार्य द्विपक्षीय संबंधांच्या माध्यमातून सुरू झाले पाहिजे त्यामुळे दोन सरकारे व देश यांच्यातील तणाव कमी होण्यास मदत होईल ही आमची भूमिका कायम आहे. दोन्ही देशात शांतता व स्थिरता नांदण्यास द्विपक्षीय चर्चेची गरज
आहे.
काश्मीर प्रश्नावर चर्चा कशा पद्धतीने, कुठल्या व्याप्तीत व कुठल्या वेगाने करावी हे भारत व पाकिस्तान या दोन देशांनी ठरवायचे आहे ही अमेरिकेची काश्मीर प्रश्नावर भूमिका आहे व त्यात बदल झालेला नाही. दोन्ही देशांनी काश्मीरच्या मुद्दय़ावर तोडगा काढायचा आहे. दोन्ही देशांकडून केल्या जाणाऱ्या शांतात प्रयत्नांना आमचा पाठिंबा
आहे.
पाकिस्तानचे उच्चायुक्त बसित यांनी काल असे म्हटले होते की, भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे आमच्या ताब्यात असून त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप आहे. त्यांच्या अटकेबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी टाळले. जाधव यांच्या अटकेच्या बातम्या मला माहिती आहेत, पण त्याचा तपशील माहीत नाही असे टोनर यांनी सांगितले.

निवडक ब्लॉगर्सना अमेरिकेत आश्रय देण्याची तयारी
वॉशिंग्टन- बांगलादेशात अनेक ब्लॉगर्सची हत्या झाल्यानंतर निवडक ब्लॉगर्सना आश्रय देण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. बांगलादेशात बहुतांश सर्वच ब्लॉगर्सच्या जिवाला धोका आहे कारण ते नास्तिक आहेत व ते मूलतत्त्ववाद्यांना आवडत नाही. तेथे अनेक धर्मनिरपेक्ष लेखक, कार्यकर्ते व ब्लॉगर्स यांची हत्या झाली आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले, की निवडक ब्लॉगर्सना आश्रय देण्याची आमची तयारी आहे. पण त्या प्रस्तावाचा तपशील अजून अंतर्गत गृहमंत्रालयाने तयार केलेला नाही. त्याबाबत विचार सुरू आहे. बांगलादेशात अलीकडेच नझीमुद्दीन समाद (वय २८) या ब्लॉगरचा खून झाला असून तो जगन्नाथ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होता व त्याने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांवर फेसबुकच्या माध्यमातून टीका केल्याने त्याला ढाक्यातील सुत्रापूर येथे ठार करण्यात आले. टोनर यांनी सांगितले की, कायद्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला बुधवारी रात्री ज्या पद्धतीने ठार करण्यात आले ते क्रूरपणाचे आहे. नझीमुद्दीनच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, हिंसक दहशतवादा विरोधात लढण्यासाठी बांगलादेशातील लोकांना अमेरिकेचा पाठिंबा आहे. गेल्या वर्षी चार धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सची बांगलादेशात हत्या करण्यात आली होती. गेल्या महिन्यात एका धर्मातरित ख्रिश्चनाची कुरिग्रमा येथे तिघांनी गोळ्या घालून हत्या केली.