ट्रम्प यांचे सूतोवाच

पहिल्याच अर्थसंकल्पात संरक्षण तरतूद ५४ अब्ज डॉलर्सनी वाढवण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. व्हाइट हाऊसने सांगितले, की संरक्षणखर्चात वाढ केली जाणार असली, तर परदेशांना दिली जाणारी संरक्षण मदत मात्र कमी केली जाणार आहे.

ट्रम्प यांनी नॅशनल गव्हर्नर्स असोसिएशनच्या बैठकीत सांगितले, की यंदाचा अर्थसंकल्प लोकांची व देशाची सुरक्षा यावर भर देणारा असेल. इतरही अनेक गोष्टी आहेत, पण या दोन गोष्टींवर जास्त भर दिला जाईल. संरक्षण खर्चात ऐतिहासिक वाढ केली जाणार असून, अमेरिकी लष्कराची फेरबांधणी केली जाणार आहे. काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात उद्या रात्री आपण यावर सविस्तर विवेचन करू. आताच्या धोकादायक काळात अमेरिका सुरक्षेला महत्त्व देते असा संदेश आम्ही यातून देणार आहोत.

ट्रम्प यांच्या भाषणानंतर व्हाइट हाऊसच्या अर्थसंकल्प नियोजन अधिकाऱ्याने कॉन्फरन्स कॉलमध्ये वार्ताहरांना सांगितले, की संरक्षण खर्चात ५४ अब्ज डॉलर्सची वाढ करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनांतून वाचलेल्या पैशातून ही वाढ केली जाणार आहे. परदेशांना केलेल्या संरक्षण व इतर मदतीत कपात केली जाईल. मध्यपूर्वेत गेली १७ वर्षे संघर्ष चालू आहे. तिथे ६ ट्रिलियन डॉलर्स खर्च झाले आहेत ते आम्हाला मान्य नाही. संघराज्य कायदा अंमलबजावणी व इतर संबंधित बाबींवर सुरक्षेच्या कारणास्तव खर्च वाढवला जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेला सुरक्षित करण्याचे वचन मी दिले आहे. गुन्हेगार व हिंसाचार करणाऱ्यांना देशातून घालवण्याचा आमचा निर्धार आहे असे त्यांनी सांगितले.

चीनच्या धोरणाला मान्यता देण्यासाठी ट्रम्प अनुकूल

चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ या धोरणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनुकूल आहेत. निवडणुकीच्या काळात चीनच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रम्प यांना या बदल्यात काही तरी मिळाल्याची चर्चा आहे

व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव सीन स्पायसर म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष नेहमीच काही तरी मिळवत असतात. त्याच वेळी त्यांनी चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ या धोरणाबाबत मागील काही महिन्यांपासून ट्रम्प अनुकूल असल्याचे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी चीनच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केला होता. मागील तीन दशकांत अमेरिकेने या धोरणाला अनुकूलता दर्शविली नव्हती. मात्र ट्रम्प यांनी एकाच व्यापारी चर्चेत या धोरणाला अनुकूलता दर्शविली आहे. या महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष क्सी जिंगपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात याबाबत दूरध्वनीवरून चर्चा झाली. जिंगपिंग यांनी विनंती केल्यानंतर ट्रम्प यांनी या धोरणाला मान्यता दिली. मात्र अमेरिकी नागरिकांना याद्वारे काही तरी मिळेल, असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांना चीनच्या महत्त्वाच्या धोरणांची माहिती आहे. चीनची अर्थव्यवस्था अधिक बारकाव्यांसह समजून घेण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होईल. त्यामुळे अमेरिकेचीच प्रतिमा उजाळेल, असे स्पायसर म्हणाले.