हिंदूंचा महत्त्वाचा सण मानला जाणाऱ्या दिवाळीच्या संस्मरणार्थ दीपावली टपाल तिकीट अमेरिकेत या वर्षी जारी केले जाणार आहे. भारतीय अमेरिकी व्यक्तींनी गेली सात वर्षे दीपावली सणासाठी तिकीट जारी करण्यासाठी अमेरिकी काँग्रेस सदस्यांकडे पाठपुरावा केला होता. या निर्णयाचे अमेरिकेतील भारतीय समुदायाने स्वागत केले आहे. या तिकिटावर पेटलेल्या पारंपरिक दिव्याचे छायाचित्र असून, त्याला सोनेरी रंगाची पाश्र्वभूमी आहे व फॉरेव्हर यूएसए २०१६ अशी अक्षरे खाली लिहिली आहेत.

येत्या ५ ऑक्टोबरला हे तिकीट जारी केले जाणार आहे. अमेरिकी टपाल सेवा (यूएसपीएस) हे तिकीट जारी करणार असून, ते नोव्हेंबरमध्ये विक्रीस उपलब्ध होणार आहे, असे काँग्रेस सदस्या कॅरोलिन मॅलोनी यांनी न्यूयॉर्क येथे सांगितले. कनेक्टिकट येथील सॅली अँडरसन यांनी तिकिटावरील दिव्याचे छायाचित्र काढले असून, या प्रकल्पाचे कला संचालक विल्यम गिकर हे आहेत. दीपावली टपाल तिकीट हा अनेक वर्षांच्या पाठपुराव्याचा परिणाम असून आता त्यात यश आले आहे, असे मॅलोनी यांनी सांगितले. दीपावली हा जगातील लाखो भारतीय अमेरिकी व्यक्तींसाठी महत्त्वाचा अध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सव असून, अजून त्यावर टपाल तिकीट काढले गेले नव्हते. प्रत्येक प्रमुख धर्मातील काही प्रमुख बाबींची टपाल तिकिटे आहेत.

त्यात आता हिंदू धर्माचा समावेश झाला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत भारताच्या महावाणिज्यदूत रिवा गांगुली दास व दीपावली टपाल तिकीट प्रकल्पाच्या अध्यक्ष रंजू बात्रा, भारतीय वंशाचे वकील रवि बात्रा या वेळी सिटी हॉलमधील कार्यक्रमास उपस्थित होते.

या तिकिटातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळेल, असे मॅलोनी यांनी सांगितले. टपाल तिकिटाच्या मोहिमेचे नेतृत्व रंजू बात्रा, काँग्रेस सदस्या व हिंदू समर्थक तुलसी गॅबार्ड यांनी केले होते.