महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जगभरातील खासगी आणि सरकारी संस्था बळकट करणे हे आमचे उद्दिष्ट असून भारतालाही अशी मदत करण्यास आमची तयारी आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलॅण्ड यांनी शुक्रवारी येथे केले. दिल्ली बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्येही उमटले होते, या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या.
महिलांवरील अत्याचार रोखणे हे अमेरिकेचे प्रथमपासूनचे धोरण असून त्यासाठी आम्ही सातत्याने परिश्रम घेतो. भारतात अथवा जगभरातील कोणत्याही देशात महिलांवर होणारे अत्याचार रोखणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्या-त्या देशांतील खासगी आणि सरकारी संस्था बळकट होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही भारताची मदत करू इच्छितो. महिला सक्षमीकरणासाठी खासगी संस्थांच्या सहकार्याने आम्ही अनेक कार्यक्रम आखले असून पुरुषी अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना त्याद्वारे साहाय्य मिळू शकते. यापलीकडे जाऊन भारताला या कामी कोणतेही सहकार्य करण्याची आमची तयारी आहे, असे त्या म्हणाल्या. दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या निमित्ताने भारताला संबंधित कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता भासल्यास त्या कामीही आम्ही त्यांना काही सल्ला देऊ शकू, असे त्यांनी नमूद केले.