सिक्कीममधल्या डोकलामवरून सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांचे परस्पर संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. चीन एकीकडे युद्धाची धमकी देत असतानाच हा प्रश्न दोन्ही देशांनी चर्चा करून सोडवावा असं अमेरिकेनं म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते हेदर नोर्ट यांनी अमेरिकेत झालेल्या पत्रकारांच्या संमेलनात ही प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेचे संबंध दोन्ही देशांसोबत आहेत, त्यामुळे डोकलामप्रश्नी जा काही तणाव चीन आणि भारतात सुरू आहे त्यावर आमची नजर आहे असंही हेदर नोर्ट यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांनी डोकलामचा सीमा प्रश्न आपसात चर्चा करून सोडवावा असाही सल्ला नोर्ट यांनी दिला आहे.

याआधी अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा आणि अमेरिकेचे इलिनोईचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी डोकलाम वादासाठी चीन जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मात्र आता चीन आणि भारत यांनी डोकलाम प्रश्नी चर्चा करावी अशी भूमिका अमेरिकेतर्फे मांडण्यात येते आहे.

चीन हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतो आहे असाही आरोप कृष्णमूर्ती यांनी यााधी केला आहे. तसंच डोकलाम प्रश्नी जे काही सुरू आहे ते निश्चितच चिंताजनक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राजा कृष्णमूर्ती हे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी चीन प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर चीन भारताला डिवचण्याचा प्रय़त्न करत असल्याचा आरोप केला होता.

काय आहे डोकलामचा वाद?
चीननं चुंबी खोऱ्यातल्या याटुंग आणि डोकलाममध्ये रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं, या कामाला भारतानं कडाडून विरोध दर्शविला, मात्र या विरोधाकडे चीननं सपशेल दुर्लक्ष केलं, ज्यानंतर भारतानं लक्ष ठेवण्यासाठी बंकर उभारले, भारतानं उभारलेले दोन बंकर चिनी सैन्यानं उद्ध्वस्त केले.

या कारवाईनंतर भारतानं आपल्या लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली आणि नेमक्या याच कारणावरून दोन्ही देशांमध्ये तणाव चांगलाच वाढला. गेल्या तीन महिन्यांपासून डोकलामचा वाद सुरू आहे. या वादावर चीनची भूमिका वारंवार बदलताना दिसते आहे.

आता याच डोकलाम वादावर भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी चर्चा करून प्रश्न सोडवावा असं अमेरिकेनं म्हटलं आहे. निदान अमेरिकेच्या सल्ल्यानंतर तरी डोकलाम प्रश्नी चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.