अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रशासकीय अधिकारी अध्यक्षांची छायाचित्रे काढण्यास अटकाव करतात. आणि त्यामुळे आजवरच्या व्हाइट हाऊसच्या पारदर्शकतेच्या सूत्राला बाधा येत आहे, असा आरोप करीत ओबामा प्रशासनाचा निषेध येथील प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला. कोणतीही सरकारी जबाबदारी पार पाडत असताना ओबामा यांची छायाचित्रे काढण्यास, ध्वनिचित्रमुद्रण करण्यास छायाचित्रकारांना मज्जाव केला जातो, असा आरोप व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला.
अमेरिकेतील ‘व्हाइट हाऊस कॉरस्पाँडन्टस् असोसिएशन’ या संघटनेने अन्य वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्यांसह व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जय कार्ने यांच्याकडे तक्रार अर्ज पाठवला आहे. अधिकाऱ्यांकडून होणारा विरोध इतका तीव्र असतो की, काही वेळा तर कॅमेऱ्याच्या लेन्सवर हात ठेवायलाही ते कमी करत नाहीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पत्रावर अमेरिकन सोसायटी ऑफ न्यूज पेपर्स एडिटर्स, द असोसिएटेड प्रेस मॅनेजिंग एडिटर्स आणि व्हाइट हाऊस न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींनी सह्य़ा केल्या आहेत. या आरोपाबाबत भाष्य करताना, अध्यक्षांचे काही कार्यक्रम हे खासगी स्वरूपाचे असतात आणि त्याची जाहीर वाच्यता होणे अपेक्षित नसते, असा बचाव व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी केला.
मात्र असे असेल तर छायाचित्रकारांना आणि पत्रकारांना अशा कार्यक्रमांसाठी बोलावले का जाते आणि त्याच कार्यक्रमांची छायाचित्रे व्हाइट हाऊसतर्फे प्रसिद्ध का केली जात होती, असा सवाल पत्रकारांच्या संघटनेने केला आहे.