राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर सुधारणा करण्याच्या तयारीत आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कर दरात मोठी कपात केली जाणार आहे. नव्या रचनेत कराचा दर ३५ टक्क्यांवरून १५ टक्के इतका कमी होईल, अशी माहिती अमेरिकेचे अर्थमंत्री स्टिवन म्यूचिन यांनी बुधवारी दिली.

ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारावेळी दिलेली आपली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेत रोजगाराच्या संधी वाढवणे आणि मध्यमवर्गीय नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे आपले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. वॉशिंग्टनमध्ये एका परिसंवादात म्यूचिन यांनी कर रचनेतील सुधारणेच्या प्रस्तावाविषयी सांगितले.
छोट्या व्यावसायिकांना मिळणार फायदा
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च कर दर ३९.६ टक्क्यांवरून ३० टक्क्यांच्या आसपास आणला जाईल. या कर रचनेचा छोट्या व्यावसायिकांना सर्वाधिक फायदा होईल. त्यांचा कराचा दर ३९.६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत आणला जाईल. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर सुधारणा असेल, असा दावा म्यूचिन यांनी केला. या योजनेत चाइल्ड केअर सारख्या सुविधांचाही समावेश असल्याचे व्हाइट हाऊसमधील सूत्रांकडून समजते.
ट्रम्प यांच्या टीमने रिपब्लिकन नेत्यांबरोबर या प्रस्तावाविषयी चर्चा केली. या प्रस्तावात आणखी चांगल्या सुधारणा केल्या जातील असेही सांगण्यात आले. याच वर्षी ही नवीन कररचना लागू केली जाऊ शकते, असे सांगण्यात येते.