अमेरिकन लेखक जॉर्ज साँडर्स यांना ‘लिंकन इन दी बाडरे’ या त्यांच्या कांदबरीसाठी प्रख्यात मॅन बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते दुसरे अमेरिकन लेखक आहेत. लघु कथांसाठी प्रसिद्ध असणारे जॉर्ज साँडर्स यांना काल्पनिक कथा श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. अब्राहम लिंकन यांना त्यांच्या तरूण मुलाच्या मृत्यूनंतर झालेल्या दु:खद वेदनांवर आधारित ही कादंबरी आहे.

लंडनमधील गिल्डहॉल येथे निवड समितीचे सदस्य लोला बारोनेस यंग यांनी पुरस्काराची घोषणा केली. साँडर्स यांना एक चषक आणि ५० हजार पौंडचा चेक प्रदान करण्यात आला. लिंकन इन बॉडरे ही कादंबरी सहानुभूतीचा अर्थ आणि अनुभवाची व्याख्या सांगते, असे यंग यांनी यावेळी म्हटले. लेखक साँडर्स यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी निवड समितीचे आभार मानले. न्यूयॉर्क येथे राहत असलेल्या ५८ वर्षीय साँडर्स यांचा जन्म टेक्सास येथे झाला असून बुकर पुरस्काराच्या ४९ वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे अमेरिकन ठरले आहेत.