अमित शहांचे वक्तव्य : इंदिराजींसारखी आम्ही माध्यमांच्या तोंडांना कुलपे लावली नाहीत 

‘इंदिराजींनी (गांधी) लादलेल्या आणीबाणीशी नरेंद्र मोदी सरकारची कशी तुलना करता? इंदिराजींनी तेव्हा सर्व माध्यमांच्या तोंडांना कुलपे लावली होती. र्निबध लादले होते. मोदी सरकारने तसे कधी केले आहे? माध्यमे आमच्याविरुद्ध हवी तशी टीका करू शकतात,’ अशी टिप्पणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केली.

नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘११, अशोका रोड’ या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहा बोलत होते. सत्तरच्या दशकामध्ये इंदिरा गांधी यांनी आपल्या विरोधकांना जसे वेचून लक्ष्य केले होते, तसेच मोदी सरकार लालूप्रसाद यादव, पी. चिदंबरम, भूपिंदर हुड्डा यासारख्या विरोधी नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करते आहे का? या प्रश्नातील मेख पाहून शहा चांगलेच भडकले आणि म्हणाले, ‘इंदिराजी आणि आणीबाणीची मोदी सरकारशी तुलनाच कशी करू शकता? माध्यमांच्या तोंडांना आम्ही कुलपे लावलेली नाहीत. आमच्यावर ते खुशाल टीका करू शकतात. सरकारच्या चुका दाखवू शकतात. त्यांना कोणीही अडविलेले नाही.’

त्या घुश्श्यातच ते पुढे म्हणाले, ‘एक हजार कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप (लालूप्रसादांवर) आहे. आपल्यावरील आरोपांचे खंडन त्यांनी माध्यमांसमोर येऊन जरूर करावे. पण बेनामी मालमत्तांचे आरोप असताना, पुरावे असताना सरकारने गप्प बसावे का? सरकारने कारवाई करू नये का? ‘नारदा स्टिंग’ ऑपरेशनमध्ये तर तृणमूलचे मंत्री, खासदार उघडउघड लाच घेताना दिसताहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा करू नये का?’

शहांनी प्रास्ताविकामध्ये मुक्त माध्यमांची लोकशाहीसाठी गरज असल्याची टिप्पणी स्वत:हून केली होती. पण नंतर बेरोजगारीच्या प्रश्नावरून त्यांनी पुन्हा माध्यमांकडे बोट दाखविले. आयटी कंपन्यांमधून असंख्य कर्मचाऱ्यांना कमी केले जात असल्याचा दाखला देऊन बेरोजगारीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मध्येच अडवून ते म्हणाले, ‘अजूनतरी कर्मचाऱ्यांना इतक्या मोठय़ा प्रमाणात काढलंय का? केवळ वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या आल्या आहेत. पण वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या खऱ्या कुठे असतात? तुम्हाला तसे वाटत असेल, पण जनतेला तसे वाटत नाही.’

पराभव नाही होणार

दिल्लीत सध्या उन्हाची काहिली आहे. वातानुकूलित कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेदरम्यान शहा स्वत:च्या रुमालाने चेहरा पुसत असताना त्यांच्या पुढील ‘खड्डय़ा’त दबा धरून बसलेल्या कॅमेऱ्यांनी एकदम क्लिकक्लिकाट केला. तेव्हा शहा जोरजोरात हसून म्हणाले, ‘या छायाचित्रांचा काही उपयोग होणार नाही. भाजप पराभूत नाही होणार.’

देशाचे भविष्य अंधकारमय..

मोदींची तीन वर्षे म्हणजे फक्तच वीरश्रीयुक्त भाषणबाजी, बडय़ाबडय़ा बाता आणि पोकळ आश्वासने. खरे तर या सरकारमुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा देशाचे भविष्य अतिशय अंधकारमय बनले आहे. हा देश यापूर्वी इतका कधीच विखुरलेला नव्हता. संघर्षांच्या उंबरठय़ावर देशाचे भविष्य येऊन ठेपलेले आहे.. कमलनाथ, ज्येष्ठ काँग्रेस नेते 

शहावाणी..

  • ’सत्तर वर्षांमध्ये जे करता आले नाही, ते काम तीन वर्षांमध्ये करून दाखविण्याचा प्रयत्न सरकारने केला.
  • ’सव्वाशे कोटींच्या लोकसंख्येच्या देशामध्ये सर्वाना रोजगार देणे अवघड आहे, पण सरकारने रोजगार निर्मितीचे अनेक प्रयत्न केलेत.
  • ’यापूर्वीही काश्मीरचा प्रश्न चिघळला होता. लवकरच काश्मीर पूर्वपदावर नक्की येईल.
  • ’आमचे सरकार स्वच्छ आहे. अगदी नावापुरते आरोप करायलाही विरोधकांनासुद्धा संधी मिळालेली नाही.
  • ’मोदींनी देशवासीयांची विचार करण्याची पद्धत बदलली, तुष्टीकरण व घराणेशाही मोडीत काढून राजकारणाचा पोत बदलला.
  • ’वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सध्यातरी अजेंडय़ावर नाही.