cभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. सीमेपल्याड करण्यात आलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये एकही भारतीय जवान जखमी झाला नव्हता. शहांनी जवानांच्या या पराक्रमाचे तोंडभरून कौतूक केले आहे. कोणतीही जीवितहानी न होता दहशतवाद्यांचे मोठे नुकसान करणे हे भारतीय लष्कराचा पराक्रम आणि देशाच्या सुरक्षेविषयक असलेली निष्ठा सिद्ध करतात, असे अमित शहा यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तसेच दहशतवादाविरुद्ध उघडलेल्या आघाडीबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूकही केले आहे. दहशतवादाविरुद्ध पहिल्यांदाच अशाप्रकारची कारवाई करण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतीयांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचेही शहा यांनी सांगितले.
भारतीय लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी गुरूवारी दिल्लीत झालेल्या पत्रकारपरिषदेत या सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपासून तब्बल २ किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत शिरून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत ३० ते ३५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानकडून काही लष्करी हालचाली झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पाकिस्तान सीमेरेषेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील काही गावे रिकामी करण्यात आली असून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे.