मार्गदर्शक मंडळातील नेत्यांनी उघडपणे कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांसमोर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. गुजरातमधील कच्छ येथे सुरू असलेल्या संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या (प्रचारक) प्रशिक्षण वर्गात शहा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा शहा सरसंघचालकांना भेटले आहेत. बिहारमधील पराभवानंतर पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आल्याने शहा खासदारांवर कारवाई करण्याच्या इराद्यात होते. खा. शत्रुघ्न सिन्हा, भोला सिंह यांनी अमित शहा यांना बिहारमधील पराभवासाठी जबाबदार धरले होते. मात्र ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी पराभवाचे विश्लेषण करण्याची मागणी करून शहा यांची कोंडी केली. हीच व्यथा मांडण्यासाठी शहा संघाच्या नेत्यांना भेटले.

अडवाणी, जोशी यांची मनधरणी करण्यासाठी रविशंकर प्रसाद, अरुण जेटली तसेच नितीन गडकरी यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती. शहा सध्या राजनाथ सिंह यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. त्यानंतर त्यांना पुन्हा जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मात्र या चर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नेत्यांची समजूत काढण्यासाठी शहा यांनी संघ नेत्यांना गळ घातली. त्यानुसार अडवाणी -जोशी यांच्याशी संघाचे सरकार्यवाह व भाजपशी समन्वय राखण्याची जबाबदारी असलेले कृष्णगोपाल चर्चा करण्याची शक्यता आहे.