मुख्यमंत्री, दानवे, चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या चर्चेनंतरही पक्षप्रवेशाचे चित्र अस्पष्ट अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर सोमवारी रात्री भाजप पक्षाध्यक्ष अमित शहांशी चर्चा केली. या सर्व चर्चा उघड झाल्याने राणे हे भाजपच्या आणखी जवळ गेल्याचे मानले जात आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांच्या दाव्यानुसार, ना शहांनी पक्षप्रवेशाचा विषय काढला, ना राणेंनी तशी स्पष्ट विनंती केली. याउलट काँग्रेसमध्ये झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत त्यांनी भाजप प्रवेशाची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राणे सोमवारी दुपारी दिल्लीत पोहोचले. अधिकृत निमित्त होते ते कोकणातील एका हॉस्पिटलच्या उदघाटनाचे निमंत्रण देण्याचे. पण तो वरकरणी मुलामा होता. प्रत्यक्षात त्यांच्या वाजतगाजत असलेल्या भाजप प्रवेशाला अंतिम रूप देण्याचा हेतू होता. भाजपची दिवसभर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होती. त्यामुळे राणेंना अमित शहांच्या व्यस्त वेळापत्रकातून भेटीची वेळ मिळत नव्हती. पण सात वाजण्याच्या सुमारास राणे अशोका रस्त्यावरील दानवेंच्या निवासस्थानी पोचले आणि तिथे मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील आले. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शहांच्या बैठकीसाठी पक्ष मुख्यालयात गेले. मग दानवे, चंद्रकांत पाटील हे राणेंना घेऊन शहांच्या अकबर रस्त्यावरील निवासस्थानी पोचले. पण शहांची बैठक लांबल्याने शहांसाठी त्यांना ताटकळत बसावे लागले. शहांच्या निवासस्थानी फडणवीस आले नाहीत. त्यांना मध्यरात्रीच कोरियाच्या दौऱ्यावर जायचे असल्याने ते थेट मुंबईला रवाना झाले. रायगडमध्ये राणे यांच्या पक्षांतराचा परिणाम नाही! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहांनी स्वत:हून पक्षप्रवेशाचा विषयच काढला नाही आणि राणेसुद्धा तसे स्पष्टपणे बोलले नाहीत. याउलट काँग्रेसने आपली कशी फसवणूक केली याचा पाढा त्यांनी वाचला. चर्चा राजकीय स्वरूपाची जास्त झाली, पण त्यात पक्षप्रवेशाचा थेट उल्लेख झाला नाही. याउलट शहांनी संबंधित हॉस्पिटलची अधिक माहिती घेणे पसंद केले. यापूर्वी राणेंची शहांबरोबर अहमदाबादला भेट झाल्याची चर्चा होती. पण त्याचा इन्कार सर्वानीच केला होता. पण सोमवारचे बोलणे उघडपणे केले गेले. भेट ३५ मिनिटांची झाली. मात्र, मागील दाराने प्रयाण करून राणे, चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना चकविले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही राणेंच्या पक्षप्रवेशाबद्दल नीट सांगता येणार नाही. कदाचित ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर स्पष्टता येईल. एकाच विमानाने शहा, राणे मुंबईला.. प्रत्यक्ष बैठकीमध्ये शहा व राणेंनी पक्षप्रवेशाबद्दल थेट चर्चा केली नसली तरी ते दोघे एकाच विमानातून रात्री उशिरा मुंबईला रवाना झाल्याचे समजते. त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, सोमवारच्या घडामोडीत केंद्रीय मंत्री व राणेंशी उत्तम संबंध असलेले नितीन गडकरींचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. शहांकडील बैठकीलाही ते नव्हते.