सुरक्षिततेच्या कारणास्तव बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील डोंगरात साकारलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हवाई मार्गाचा आधार घ्यावा लागला. या मूर्तीकडे जाणारा घाटमार्ग विहित निकषाप्रमाणे नसल्याने आणि उपरोक्त ठिकाणी जाण्यास विशिष्ठ क्षमतेच्या वाहनांचाच वापर करावा लागत असल्याने त्यांना त्या ठिकाणी जाऊ देण्यास सुरक्षा यंत्रणेने नकार दिला. वाहनाने जाऊनही मूर्तीजवळ पोहोचण्यासाठी १५० पायऱ्या पार करणे क्रमप्राप्त ठरते. पोलीस यंत्रणेने ऐनवेळी त्यासाठी तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. परंतु, सावधगिरी म्हणून शहा यांनी या भव्य मूर्तीचे हेलिकॉप्टरमधून दर्शन घेणे पसंत केले.
मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथील उंच डोंगराच्या मध्यावर भगवान ऋषभदेव यांची भव्य पूर्णाकृती मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व मस्ताभिषेक सोहळा सध्या सुरू असून शनिवारी त्यासाठी भाजप अध्यक्षांनी हजेरी लावली. सुमारे दीड दशकांच्या प्रयत्नातून साकारलेली ही अखंड पाषाणात असणारी एकमेव मूर्ती असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. ‘अहिंसेचे प्रतिक’ मानल्या जाणाऱ्या या मूर्तीचे शहा यांनी प्रत्यक्ष दर्शन करावे असा संयोजकांचा प्रयत्न होता. तथापि, या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून ज्या घाटमार्गे जावे लागते, तो शहा यांच्या दर्शन सोहळ्यातील मुख्य अडसर ठरला. महोत्सव समितीने या मार्गाची बांधणी केली असून त्याची या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बांधकाम विभागाने तपासणी केली होती. पायथ्यापासून डोंगराच्या विशिष्ट एका भागापर्यंत जाणारा हा दीड ते दोन किलोमीटरचा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिने आवश्यक ते निकष पूर्ण करणारा नसल्याचे बांधकाम विभागाने सूचित केले होते. या मार्गावर जाण्यासाठी महोत्सव समितीची अधिक क्षमता असणारी वाहने कार्यरत आहेत. अन्य कोणतेही वाहन या ठिकाणी पोहोचू शकत नाही.
वाहनाने जाऊनही मूर्तीजवळ पोहोचण्यासाठी जवळपास १५० पायऱ्यांचा चढ-उतार क्रमप्राप्त ठरतो. ही एकंदर स्थिती लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा शहा यांना मूर्तीकडे नेण्यास तयार नव्हती. शहा यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यावर त्यांची इच्छा असल्यास यंत्रणेने काही निवडक वाहनांना घाटमार्गाने जाऊ देण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कार्यक्रमस्थळी आल्यावर शहा यांनी जैन धर्माचे महंत व साध्वी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्य सोहळ्यात ते सहभागी झाले. हा कार्यक्रम विहित वेळेपेक्षा काहीसा लांबल्याने शहा यांच्या वाहन ताफ्याने थेट हेलिपॅड गाठले.
कार्यक्रमास हजेरी लावूनही शहा यांना भव्य मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य झाले नाही. हेलिकॉप्टर आकाशात झेपावल्यावर मांगीतुंगी डोंगराला प्रदक्षिणा घालून ते मार्गस्थ झाले. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल २० कोटीचा निधी दिला आहे. अतिशय विलंबाने हा निधी दिला गेल्यामुळे विहित मुदतीत काम करणे अवघड झाले.