दिल्ली व बिहारमधील दणदणीत पराभवानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ‘मायक्रो मॅनेजमेंट’ सुरू केले आहे. याशिवाय गुजरातमधील पटेलांचे आरक्षण आंदोलनामुळे भाजपविरोधात राज्यात असलेली नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी शहा यांनी सुरू केल्या आहेत. दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर आता शहा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नव्या टीमच्या शोधात आहेत. या नव्या टीममध्ये उत्तर प्रदेशची जबाबदारी राज्यसभा खासदार भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
शहा यांनी उत्तर प्रदेश व गुजरातमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक जागा जिंकण्यात आल्या तरी संघटनात्मक पातळीवर सामसूम असल्याचा अहवाल राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शहा यांना दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व केंद्रीय मंत्र्यांना उत्तर प्रदेशमध्ये मुक्कामी प्रवास करण्याचा आदेश शहा देणार आहेत. ओमप्रकाश माथूर यांच्याकडे शहा यांनी यापूर्वीच उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. माथूर यांच्यामार्फत संघटनात्मक कामाचा आढावा शहा यांनी घेतला. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसला. त्याची माहिती गुजरातमधील पदाधिकाऱ्यांनी शहा यांना दिली. पंतप्रधानांनीदेखील या बैठकीचा अहवाल शहा यांनी दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवल्याने भाजपनेदेखील उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये ‘वॉर रूम’ स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपने आयटी तज्ज्ञ, माहिती विश्लेषकांचा शोध सुरू केला आहे. भाजप मुख्यालयात उत्तर प्रदेशमधील जातीय समीकरणे, लोकसंख्या, मतदारसंघनिहाय माहितीची पत्रके तयार करण्यात आली आहे.