भाजपच्या बैठकांमध्ये नेमकं काय घडलं, काय निर्णय झाले याची माहिती बाहेर जायला नको याची काळजी घ्या असे आदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिले आहेत. शुक्रवारीच अमित शहा हे मध्यप्रदेश दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी प्रसारमाध्यमांपासून दूर राहा असा सल्ला भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

शुक्रवारी एका खासगी विमानानं अमित शहा भोपाळला पोहचले, पक्ष कार्यालयात पोहचताच अमित शहा यांनी पक्षाचे पदाधिकारी, कोअर ग्रुपचे सदस्य, प्रवक्ते, संघटनेचे पदाधिकारी आणि मोर्चा पदाधिकारी या सगळ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपला आक्रमक पवित्रा दाखवत मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला सगळ्यानांच दिला आहे.

ही बैठक पार पडल्यावर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा सगळ्याच नेत्यांनी आम्हाला काहीही सांगण्याचा आदेश नाही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोठमोठी भाषणं देऊ नका असे आदेश दिले आहेत. तसंच स्वागत समारंभाचे कार्यक्रम टाळा असंही म्हटलं आहे.

एका पदाधिकाऱ्याला बैठकीत काय घडलं हे विचारलं असता त्यानं दिलेलं उत्तर रंजक होतं, मी एक छोटा कार्यकर्ता आहे मला कृपा करून काहीही विचारू नका अशा विनवण्याच या पदाधिकाऱ्यानं पत्रकारांना केल्या. अमित शहा पुढचे तीन दिवस मध्य प्रदेशाचा दौरा करणार आहेत. त्यांचं स्वागत अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं करण्यात आलं. हे स्वागत एवढं भव्य होतं की शहा यांना पक्षाचं कार्यालय गाठताना दोन तास लागले, ज्यामुळे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच चिडले होते अशीही माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात अमित शहा यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं अनावरण केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुरूवारीच भोपाळला येणार होते मात्र गुरूवारी त्यांचं येणं रद्द झालं ज्यामुळे अमित शहा आज एका खासगी विमानानं भोपाळला पोहचले.