मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग हे क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. मागे एका मुलाखतीत (रेखाबरोबर काम करणार का, या प्रश्नावर) अमिताभ बच्चनही नर्मविनोदी शैलीत म्हणाले होते की, मला सध्या कामाची खूप गरज आहे, त्यामुळे मी कोणाहीबरोबर चित्रपट करायला तयार आहे. देशात ‘मोदी लाट’ उसळल्याने भाजपच्या अन्य नेत्यांप्रमाणेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनाही फारसे काम उरलेले नाही. पण म्हणून हे सर्वजण गोव्यातील रोजगार हमी योजनेत दिवसाला शंभर रुपये मेहनतान्यावर राबत असतील, अशी शंकाही कुणाला येणार नाही. पण हे ‘गुपित’ माहिती अधिकारातूनच फुटले आहे!
गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) लाभार्थ्यांमध्ये  या सर्व नामवंतांबरोबरच आमिर खान, कपिलदेव, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराजसिंग यांचीही नावे आहेत. एवढेच नव्हे तर या नामवंतांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची नावेही यादीत असून अमिताभ यांच्या दिवंगत मातोश्री तेजी बच्चन यादेखील या यादीनुसार रोहयो कामांवर राबत आहेत. या सर्वाना रोज शंभर रुपये याप्रमाणे दीडशे दिवसांची मजुरी दिली गेली आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाकडूनच ‘गोवा परिवर्तन मंच’ या संस्थेने माहिती अधिकारात ही यादी मिळविली. या बनावट लाभार्थ्यांना ही रक्कम देऊन केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील हा पैसा हडपला गेल्याचा आरोप संस्थेचे निमंत्रक यतीश नाईक यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची तक्रार संस्थेने थेट राष्ट्रपतींकडे केली आहे.