दुबई, हाँगकाँग आणि मलेशियामध्ये राहणारे पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील ‘आम्रपाली’ आंब्याचे ग्राहक झाले आहेत. दुबईत आठ टन आंब्याची निर्यात करण्याची ऑर्डर मिळाल्याची माहिती राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली. गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ‘आम्रपाली’ आंब्याची निर्यात करण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी संजय सेनगुप्ता यांनी सांगितले. आत्तापर्यंत केवळ मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये लोकप्रिय असलेल्या या आंब्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचेदेखील ते म्हणाले. बांकुराला आंब्याच्या विश्वात ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगत, येथील लाल माती विशिष्ट स्वाद निर्माण करत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. हाँगकाँग आणि मलेशिया येथूनदेखील विचारणा झाली असून, पुढील वर्षी तेथे निर्यात सुरू होणार असल्याचे सेनगुप्ता म्हणाले.