नागपूरहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा काल रात्री मुंबईच्या विमानतळावर उतरताना टायर फुटल्याची घटना घडली होती. यावेळी प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यासाठी एका हवाईसुंदरीने विमानाचे ‘इमर्जन्सी शूट’ (खालच्या बाजूचा छोटा दरवाजा) उघडला होता. मात्र, यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागल्याने या हवाईसुंदरीवर एअर इंडियाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत ‘एएनआय’ने वृत्त दिले आहे.


सुमारे १६० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडियाचे ‘AI 102’ हे विमान काल रात्री १० वाजता मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक विमानाचा एक टायर फुटला. यामध्ये कोणालाही इजा झालेली नसली तरी, विमानाचा लँडिंग गिअरला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विमान बराच काळ मुख्य धावपट्टीवर अडकून पडले होते. यावेळी प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यासाठी विमानातील क्रू मेम्बर्सने विमानाच्या खालच्या डाव्या बाजूला असलेले इमर्जन्सी शूट उघडले. या शूटवरून खाली उतरताना काही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले. या अपघातामुळे काही आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला होता. नागरी विमान वाहतुक विभागाकडून या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे.

याच वर्षी ३ मार्चच्या रात्री देखील असाच अपघात घडला होता. एका जेट एअरवेजच्या विमानाचा याच धावपट्टीवर उतरताना टायर फुटला होता. त्यामुळे दुरुस्तीसाठी मुख्य धावपट्टी १२ तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या दिवशी ६ विमानांना दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आले होते. शेवटच्या तिसऱ्या मिनिटाला त्यांचे लँडिंग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.