दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानात गेल्या काही महिन्यांत महिलांच्या वेण्या कापल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर मुंबईतील भिवंडीतही काही महिलांनी अज्ञात व्यक्तीने आपल्या वेण्या कापल्याचा दावा केला होता. या घटनांना केवळ अफवा समजण्यात येत होते. मात्र, आता अशाच घटना काश्मीरमध्येही उघडकीस आल्या आहेत. या प्रकाराविरोधात काही लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, चिडलेल्या जमावाने येथे सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकांवरच हल्ला चढवला. त्यानंतर जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन आंदोलक जखमी झाले आहेत.

वेण्या कापणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात काश्मीरी जनतेने काढलेल्या निषेध रॅलीदरम्यान, जवळून जाणाऱ्या लष्कराच्या जवानांवर या आंदोलकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना प्रत्युत्तर देताना जवानांनीही आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. यात दोन आंदोलक जखमी झाले. मात्र, त्यांच्या जीविताला सध्या कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आंदोलक महिलांच्या मते काही अज्ञात लोकांनी आमच्यावर हल्ला केला आणि आमचे केस कापले. मंगळवारी एका जवानाला कुपवाडा जिल्ह्यात स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केली होती. हाच जवान वेण्या कापणारी व्यक्ती असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.