कर्नाटकमध्ये बँकेत गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली. माजी जवानाला मारहाण करणा-या पोलिसाचा प्रताप कॅमे-यात कैद झाला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना लोटला तरी देशभरातील बँकांबाहेर गर्दी कायम आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागल्या आहेत. कर्नाटकमधील बागलकोटमध्येही बँकेबाहेर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस नेमण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी दिसत आहे. या गर्दीत एक वृद्ध माजी सैनिकही होते. गर्दीला मागे ढकलणा-या पोलिसाचा पारा चढला आणि त्याने थेट मारायला सुरुवात केली. या दरम्यान पोलिसाने त्या वृद्ध माजी सैनिकाला श्रीमुखात लगावली. यावरही तो थांबला नाही. त्या वृद्धाला मारहाण करत त्याने मागे नेले. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाल्याने संतापाची लाट उसळली होती. शेवटी पोलीस प्रशासनाला जाग आली असून मारहाण करणा-या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सीमा रेषेवर जवान तासनतास उभे राहू शकतात तर आपण देशासाठी रांगेत उभे राहू शकत नाही का असा प्रश्न मोदी समर्थकांकडून उपस्थित केला जात होता. पण आता माजी सैनिकांनाच अशा प्रकारे मारहाण होत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी पंजाबमध्येही एका माजी सैनिकाचा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत मृत्यू झाला होता. ६५ वर्षीय मलूक सिंग हे बँकेत पेन्शन काढण्यासाठी गेले होते. ते बराच वेळ रांगेत उभे होते आणि यादरम्यान प्रकृती खालावल्याने ते अचानक खाली कोसळले. रुग्णालयात दाखल केले असता मलूक यांचा मृत्यू झाला होता.