समाजात स्थान नाही, राहायला घर नाही, नातेवाईक नाहीत, हाताला रोजगार नाही.. सगळा नन्नाचाच पाढा. पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागण्याशिवाय तरणोपाय नाही. भीक मागणं शक्य नसेल तर गल्ल्यांमध्ये, बारमध्ये एखादं गिऱ्हाईक पटवायचं आणि पैसे कमवायचे!
..या व्यथा आहेत- हिजडा, छक्का या शब्दाने हिणवल्या जाणाऱ्या देशभरातील तृतीयपंथीयांच्या! ‘अनाम प्रेम’ या संस्थेने पणजी येथे नुकताच तृतीयपंथीयांचा आनंदमेळावा आयोजित केला होता. अशा प्रकारच्या या पहिल्याच मेळाव्यात तऱ्हतऱ्हेच्या व्यथा ऐकायला मिळाल्या. अशा हद्दपार झालेल्या शब्दाबरोबरच तृतीयपंथीयांना समाजाने स्वीकारावे, तसेच त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना प्राप्त व्हावेत यासाठी ‘अनाम प्रेम’ ही संस्था मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग होता.
या वेदना तर आहेतच, शिवाय त्यांना आपल्या देशाच्या घटनेतही स्थान नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व व्यक्तींना मूलभूत हक्क प्रदान करताना ‘व्यक्ती’ या शब्दाच्या व्याख्येत बसविले जाते. पण हा शब्द पुरुष किंवा स्त्रियांपुरताच मर्यादित आहे. तृतीयपंथी या शब्दाचा समावेश यात नाही.  
पणजी येथील मेळाव्यात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गोवा, ओरिसा, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यांबरोबरच महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे ५० तृतीयपंथीयांनी भाग घेतला. ‘अनाम प्रेम’च्या सी. एम. सामंत, कृपाली बिडये, सतीश सोनक यांच्या प्रयत्नातून हा मेळावा साकारला. त्यात भाऊबीज, आनंदोत्सव तर साजरा झालाच, पण या तृतीयपंथीयांना सन्मानाने पैसे मिळतील यासाठी राज व भारती नायर यांनी कार धुणे, फॅशन डिझायनिंग,नृत्य शाळा, ब्युटी पार्लर असे काही व्यवसाय सुचवले.
या आनंदमेळ्यात पणजीजवळील डोना पावला या प्रसिद्ध चौपाटीवर सर्व तृतीयपंथींनी अनाम प्रेमींबरोबर समुद्रस्नानाचा आनंद घेतला. काही जण पाण्यात मुक्तपणे खेळत होते, तर एखादा कोणी आपल्याच भावविश्वात दंग वाळूत रेघोटय़ा मारल्या, तर कोणी वाळूचा किल्ला केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्यातल्या एका क्रुझवर मांडवी नदीची एका तासाची फेरी मारण्याची संधी सर्वाना मिळाली आणि मग ‘घेरे सायबा, माकानाका गो.. माकानाका गो’ च्या तालावर सर्वाचे पाय थिरकू लागले. मंद हवा, कोवळे ऊन आणि गोव्याच्या निसर्गरम्य मांडवी नदीत क्रुझवर नाचण्याची संधी मिळाल्यावर सर्व जण एकदम खूश झाले होते. सर्व तृतीयपंथी आणि अनाम प्रेमीच्या सदस्यांनी राष्ट्रगीत गाऊन या फेरीची अगळी वेगळी सांगता केली.
संध्याकाळी ‘आमचा काय गुन्हा?’ या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अभिना या तृतीयपंथीयाने त्यांच्या समाजाचे प्रश्न उपस्थित केले आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. माणूस म्हणून ओळख आणि मुख्य समाजधारेत मान्यता, वैद्यकीय मदत, समाजातील विकृत घटकांपासून संरक्षण, शिक्षण, लिंगभेद या पासून सुटका, मूलभूत मानवाधिकार, प्रेम आणि आदर याची अपेक्षा अभिनाने व्यक्त केली..  तीन दिवसांच्या या आनंदमेळ्याची सांगता होताना नि:स्पृह प्रेमाची, सकारात्मक दृष्टिकोनाची, आत्मविश्वासाची, नव्या नात्यांची, आपलेपणाची शिदोरी घेऊन या सर्व तृतीयपंथीयांनी परतीची गाडी पकडली.