काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षकांनी दहशतवादविरोधी अभियान राबवताना बुधवारी हिजबुल मुजाहिद्दीनच्या आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले. अनंतनाग येथिल बीजबहाडा रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ओमपोरा येथे एक जिवंत बॉम्ब निकामी करीत एक मोठी दुर्घटना रोखण्यात यश मिळवले.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदिल अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी अनंतनागमधील बीजबेहाडा येथे आपल्या एका सहकाऱ्याची भेट घेऊन तो तेथून निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त दलाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता.

आदिल जसा बीजबेहाडा रेल्वे स्टेशनवर पोहोचला त्याचवेळी सापळा रचलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला पळून जाण्याची संधीच दिली नाही. अनंतनाग जिल्ह्यात जबलीपोला बीजबेहाडा या भागात राहणारा दहशतवादी आदिल हा पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा होता. पोलीस चौक्यांवर हल्ल्यांप्रकरणी तसेच पंचायत सदस्य आणि पोलिसांना मारहाणीचे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, बडगाम जिल्ह्यातील ओमपोरामध्ये बुधवारी सकाळी जम्मू-काश्मीर बँकेजवळ एक ग्रेनेड आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यावर पोलिसांनी बॉम्बनाशक पथकाला पाचारण करीत हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळवले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.