मंगळावर पाणी आहे की नाही, यावर जगभरात संशोधन सुरू आहे. मंगळावर पाणी आढळल्याचा दावा अनेक खगोलशास्त्रज्ञ करतात, मात्र त्याचे सबळ पुरावे अद्याप कुणी देऊ शकले नाहीत. आता अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी तर असा दावा केला आहे की, मंगळावर एकेकाळी विशाल तळे होते. मंगळावर एक ज्वालामुखीय खड्डा सापडला असून, हा खड्डा म्हणजे मंगळावरील तळेच होते, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
अ‍ॅरिझोना स्टेट विद्यापीठाच्या स्टीव रफ यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे. या महाकाय खड्डय़ात पाणी होते, असे रफ सांगतात. मंगळावर काबरेनेट क्षाराचे अंश सापडले आहेत. मंगळावरील तळे क्षारयुक्त होते. कालांतराने हे क्षार लुप्त होत गेले, त्यानंतर हे तळेही नष्ट झाल्याचे हे शास्त्रज्ञ सांगतात. नासाने २००४मध्ये मंगळावर यान सोडले होते. या ग्रहावर १६० किलोमीटरचा महाकाय खड्डा असल्याची छायाचित्रे या यानाने दाखवली होती.