केंद्र सरकारच्या आदेशावरून देशात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आल्याने त्याचे पडसाद फेसबुक, ट्विटरसारख्या समाज माध्यमांत उमटू लागले आहेत. भारताचे तालिबानीकरण करण्याच्या दिशने सरकारने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे, अशी टीका काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
पॉर्न साईट्स पाहू इच्छिणाऱया नेटिझन्ससमोर शनिवारपासून पॉर्न संकेतस्थळांवर ब्लँक पेज लोड होत असून सक्षम अधिकाऱयाच्या निर्देशांनुसार या साईट्स बंद करण्यात आल्याचा संदेश झळकत होता. विशेष म्हणजे, याबाबत सरकारी पातळीवरून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे समाज माध्यमांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बंदीविरोधात ट्विटर आणि फेसबुकवर निषेध व्यक्त केला जात असून मोठा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी या बंदीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पॉर्न साइट्सवरची बंदी हा एखाद्याचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रकार आहे. पुढची बंदी कशावर घालणार आहात..टेलिव्हिजन की मोबाईल?, असा सवाल देवरा यांनी उपस्थित केला आहे. सरकारने भारताचे तालिबानीकरण करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल टाकले असल्याचेही ट्विट देवरा यांनी केले आहे. दरम्यान, पॉर्न साईट्सवरील बंदीचा सोशल मीडियावर काहींनी निषेध करण्यास सुरूवात केली असली तरी या बंदीचे स्वागत करणाऱयांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे