मागासवर्गीयांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशातील कपू समाजाने छेडलेल्या आंदोलनाला रविवारपासून हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तुनी शहरातील एका पोलीस ठाण्याला आग लावून दिली तर रत्नांचल एक्स्प्रेसचे दोन डबेही पेटविण्यात आले. या आंदोलनाचे लोण आंध्र प्रदेशातील इतर १३ जिल्ह्यांमध्येही पसरण्याची शक्यता रविवारीच वर्तविण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाचे सरकार या संदर्भात शासकीय आदेश जारी करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील माजी मंत्री मुद्रगड्डा पद्मनाभम यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी ‘चलो तुनी’ची हाक देण्यात आली आहे. कपू समाजाला मागासवर्गीयांचे आरक्षण देण्यात आले नाही, तर राज्यात जनक्षोभ उसळेल, असे स्वतः पद्मनाभम यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सरकारने तातडीने या संदर्भातील आदेश जारी करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.