आंध्र प्रदेशमधील कुनेरूजवळ जगदलपूर – भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरल्याने ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जगदलपूरवरुन भुवनेश्वरला निघालेल्या हिराखंड एक्सप्रेसला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आंध प्रद्रेशमधील कुनेरु स्थानकाजवळ अपघात झाला. या एक्सप्रेसचे सात डबे आणि इंजिन रुळावरुन घसरले. यात दोन सामान्य कोच, दोन स्लीपर कोच, दोन एसीचे डबे आणि लगेजच्या डब्याचा समावेश आहे.रात्री झोपेत असलेल्या प्रवाशांना नेमके काय झाले हे लक्षात आले नाही. जोरदार आवाजाने आम्ही घाबरुन उठलो अशी माहिती एका प्रवाशाने दिली. अपघातात १०० प्रवासी जखमी झाले असावेत असे या भागातील उपजिल्हाधिका-यांनी म्हटले आहे. मात्र रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अमेक प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. अपघात ऐवढा भीषण होता की यात १२ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूदेखील घटनास्थळी भेट देतील अशी माहिती रेल्वेच्या अधिका-यांनी दिली आहे.

अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र दिवस होताच बचावकार्याने वेग धरला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, हिराखंड एक्सप्रेसच्या अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात १४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर डिसेंबरमध्ये सियालदाह – अजमेर एक्सप्रेसला अपघात झाला होता. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले होते. यातील कानपूरमधील रेल्वे अपघातामागे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याची बिहार पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.