जर्मनविंग्ज कंपनीच्या सहवैमानिकाने फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत दुर्घटनाग्रस्त झालेले विमान सहेतुक पाडले. परंतु त्याआधी विमानाच्या मुख्य वैमानिकाने सहवैमानिक आंद्रे ल्युबित्झ याला विमान धोकादायक पातळीपर्यंत खाली घेण्यापासून रोखण्यासाठी कुऱ्हाडीने कॉकपीटचा दरवाजा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सुरक्षा विभागाच्या सूत्रांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
कॉकपीटबाहेर पडल्यानंतर आंद्रे याने मुख्य वैमानिकाला बाहेर ठेवले आणि आल्प्स पर्वतराजीतील अत्यंत धोकादायक पातळीवर विमान वेगाने खाली नेण्यास सुरुवात केली. ही गोष्ट मुख्य वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर आत प्रवेश करण्यासाठी त्याने कुऱ्हाडीने कॉकपिटचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तोवर वेळ निघून गेली होती. वेगवान विमानाने पर्वतराजीतील तळ गाठला होता आणि काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले होते, असे सूत्रांनी पुढे स्पष्ट केले.
कॉकपीटमधील संभाषण ध्वनिमुद्रित (कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर) करणाऱ्या यंत्रातील ध्वनिमुद्रणानुसार मुख्य वैमानिकाने दरवाजा अनेकदा ठोठावला. परंतु आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. विमानाचा वेग अचानक वाढल्यानंतर मुख्य वैमानिकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कॉकपीटमध्ये प्रवेश करण्याची गरज लक्षात घेऊन मुख्य वैमानिकाने दरवाजा तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबतचा सविस्तर खुलासा ‘जर्मनविंग्ज’च्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलेला नाही. पण विमानाच्या एका भागात कुऱ्हाड ठेवण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विमानात कोणत्याही अनुचित प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी कुऱ्हाड ठेवण्यात येते. मोठय़ा विमानात अशी शस्त्रे सर्रास ठेवण्यात येतात, असे अधिकारी म्हणाला.