युरोपीय महासंघाच्या प्रमुखांचे ब्रिटनला आवाहन

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याबाबतच्या वाटाघाटी आपला उत्तराधिकारी करेल असे राजीनाम्याची घोषणा केलेले पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी शुक्रवारी सांगितल्यानंतर, यासाठीच्या वाटाघाटी ‘शक्यतो लवकर’ कराव्यात असे महासंघाच्या प्रमुखांनी ब्रिटनला सांगितले आहे.

युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जो निर्णय ब्रिटिश नागरिकांनी घेतला आहे तो कितीही दु:खद असला तरीही ब्रिटनच्या सरकारने तो शक्य तितक्या लवकर अमलात आणावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. यात उशीर झाल्यास विनाकारण अनिश्चितता कायम राहील, असे ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मतदान झाल्यानंतर जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

युरोपीय महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क, युरोपीय आयोगाचे प्रमुख जीन-क्लॉड जंकर, महासंघाचे पार्लमेंट नेते मार्टिन शुल्झ आणि ज्यांच्या देशाकडे या गटाचे फिरते अध्यक्षपद आहे ते डच पंतप्रधान मार्क रुट यांनी चर्चेनंतर ब्रसेल्समध्ये हे निवेदन जारी केले. ऑक्टोबपर्यंत नव्या नेत्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण पायउतार होत असल्याची घोषणा करतानाच, ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू करण्यासाठी नवे पंतप्रधान जबाबदार राहतील असे डेव्हिड कॅमेरून यांनी म्हटले आहे. तथापि, ही बाब योग्य रीतीने घडून यावी यासाठी महासंघाचे नियम आहेत आणि ही प्रकिया लवकरात लवकर व्हावी असा आमचा आग्रह असून त्यासाठीची बोलणी ब्रिटनने लवकरात लवकर सुरू करावी, असे युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

युरोपीय महासंघ सोडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाबाबत संघटनेच्या सदस्यांनी घाईने निष्कर्ष काढू नये, कारण त्यामुळे युरोपचे आणखी विभाजन होण्याचा धोका आहे. ब्रिटिश नागरिकांच्या निर्णयाची आम्ही खेदपूर्वक दखल घेतली आहे. हा युरोपला तसेच युरोपच्या एकीकरणाच्या प्रक्रियेला धक्का आहे यात शंकाच नाही. महासंघाच्या सदस्यांनी एकत्र बसून परिस्थितीचे शांतपणे व समंजसपणे विश्लेषण करावे.

 – अँगेला मर्केल, जर्मन चान्सलर