तुर्कीची राजधानी अंकारामधील गजबजलेल्या भागात झालेल्या कार बॉम्बस्फोटात ३४ जणांचा मृत्यू झाला असून, १२५ जण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात अंकारामध्ये झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे.
अंकारामधील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा स्फोट घडवून आणला असण्याची शक्यता आहे. त्यादिशेने पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकृतपणे कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गजबजलेल्या भागामध्ये शक्तिशाली स्फोटके वापरून हा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकायला आला. त्याचबरोबर स्फोटानंतर परिसरात ज्वाळांचे लोट उठल्याचे अनेकांना दिसले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तुर्कीचे गृहमंत्री एफकान अला यांनी स्फोटांमागील व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून, सोमवारी त्यांची नावे जाहीर करण्यात येतील, असे सांगितले.