केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि अण्णा हजारे यांच्यादरम्यान जून २०१२ मध्ये जनलोकपाल विधेयक संसदेत चर्चेला येण्यापूर्वी महत्वपूर्ण बैठकीला हजर असणारे पुण्याचे उद्योगपती अभय फिरोदिया यांनी आता नरेंद्र मोदींसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया हे अण्णा हजारे यांचे मार्गदर्शक असलेल्या दिवंगत गांधीवादी नवलमल फिरोदिया यांचे पुत्र आहेत. यूपीएने देशाच्या अर्थव्यवस्थेत गोंधळ निर्माण केला आहे, अशा अवस्थेत फक्त नरेंद्र मोदीच देशाचे नेतृत्व करू शकतात. आज जर महात्मा गांधी असते, तर त्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला कधीच पाठिंबा दिला नसता, असे अभय फिरोदिया यांनी सांगितले. नवलमल फिरोदिया सभागृहाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभय फिरोदिया उपस्थित होते. आज आपल्या देशात वेगवेगळी विचारसरणी असणा-या घटकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे देशाच्या विकासाचा आणि लोकांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. देशात दररोज लाखभर रोजगार निर्माण होण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाला हे शक्य आहे का? असा सवालसुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही. मात्र, मोदींसारखा नेता या गोष्टी साध्य करू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे. यावेळी अण्णा हजारेंनी नवलमल फिरोदियांनी माझ्या धडपडीच्या काळात मला मागर्दर्शन केल्याचे सांगितले. मात्र, अन्य कोणत्याही विषयावर भाष्य करण्याचे अण्णांनी टाळले.