अमेरिकेतील पत्रकार जेम्स फॉली यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच इराकमधील अतिरेकी संघटना ‘आयएसआयएस’ने आणखी एका अमेरिकी पत्रकाराचा शिरच्छेद केला. स्टीव्हन्स सॉटलॉफ या पत्रकाराचा शिरच्छेद करतानाची ध्वनिचित्रफित आयएसआयएसने मंगळवारी प्रसिद्ध केली.
अत्यंत प्रतिष्ठेचे टाईम नियतकालिक आणि अन्य परराष्ट्र धोरण विषयक नियतकालिकांसाठी ३१ वर्षीय सॉटलॉफ यांनी मुक्त पत्रकार म्हणून काम केले आहे. काही दिवसांपूर्वी जेम्स फॉली यांच्या हत्येच्या ध्वनिचित्रफितीत सॉटलॉफ हेही दिसले होते. मात्र मंगळवारी आयएसआयएसने त्यांच्या हत्येचीही ध्वनिचित्रफित प्रसिद्ध केली.  ‘अमेरिकेने इराकवरील हल्ले न थांबवल्याने सॉटलॉफ यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे’, असे या चित्रफितीत म्हटले आहे.