बांगलादेशात तीन हल्लेखोरांनी कोयत्याचे वार करून हिंदू धर्मगुरूंना ठार केले. या वर्षी ठार करण्यात आलेले ते तिसरे हिंदूू धर्मगुरू आहेत. बांगलादेश हा मुस्लीम बहुल देश असून, इस्लामी लोकांनी अल्पसंख्याक व धर्मनिरपेक्ष व्यक्तींवर मोठय़ा प्रमाणात हल्ले चालूच ठेवले आहेत.

श्यामनोंदो दास असे या धर्मगुरूचे नाव असून, सकाळी साडेसहा वाजता त्यांची जेनदिया जिल्हय़ात मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी हत्या केली. त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. जेनदिया येथे सदर रुग्णालयात त्यांना दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले असे सांगण्यात आले. पोलीस अधिकारी हाफिझउर रहमान यांनी सांगितले, की दास हे राधामोहन गोपाळ मठाचे धर्मगुरू होते व पहाटे ते पूजेसाठी फुले गोळा करण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोर लगेच पळून गेले. त्यांच्या हल्ल्याची पद्धत पूर्वीसारखीच असून निधर्मी व अल्पसंख्याक समुदायांवर इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी अनेकदा हल्ले केले आहेत. वायव्य पबना येथे एका हिंदूू मठातील साधकाची हत्या केल्यानंतर काही दिवसांनीच ही हत्या झाली आहे. ७ जूनला त्याच जिल्हय़ात हिंदू धर्मगुरूंची मंदिराकडे जात असताना हत्या करण्यात आली होती. एका ख्रिश्चन व्यापाऱ्याला ५ जून रोजी कोयत्याने वार करून ठार करण्यात आले होते, तर दहशतवाद विरोधी दलातील पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीलाही सकाळच्या वेळी ठार करण्यात आले होते. फेब्रुवारीत एका हिंदू धर्मगुरूला ठार करण्यात आले होते. एप्रिलमध्ये एका प्राध्यापकाची  हत्या करण्यात आली होती. त्याच महिन्यात एका हिंदू शिंप्याची व बांगलादेशातील समलिंगी नियतकालिकाच्या एका संपादकाची मित्रासह हत्या करण्यात आली होती. आयसिस व अल काइदा इन इंडियन पेनिसुला या संघटनांनी यातील काही हल्ल्यांची जबाबदारी घेतली होती.