प्रसिद्ध अणुउर्जाविरोधी कार्यकर्ते डॉ. एस. पी. उदय कुमार यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांची वृत्तवाहिनी रिपल्बिक यांच्याविरोधात प्रेस काऊंसिल ऑफ इंडियामध्ये तक्रार दाखल केली आहे. टीआरपी वाढवण्यासाठी रिपब्लिक वृत्तवाहिनी माझ्याविरोधात तथ्यहीन वृत्त प्रसारित करत असल्याचा आरोप उदय कुमार यांनी केला आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्रकारांकडून माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचेदेखील उदय कुमार यांनी म्हटले आहे. उदय कुमार कुडनकुलम येथील अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील ‘पिपल्स मुव्हमेंट’चे संयोजक आहेत. २० जून रोजी रिपब्लिककडून एक स्टिंग ऑपरेशन दाखवण्यात आले होते. यानंतर उदय कुमार यांनी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियामध्ये तक्रार दाखल केली आहे.

कुडनकुलम येथील अणुउर्जा प्रकल्पाविरोधात ‘पिपल्स मुव्हमेंट’ चालवण्यासाठी परदेशातून निधी घेत असल्याचा आरोप रिपब्लिककडून आपल्यावर करण्यात आल्याचे उदयकुमार यांनी म्हटले आहे. यासाठी रिपब्लिक एक बोगस स्टिंग ऑपरेशन दाखवल्याचा आरोप उदयकुमार यांनी केला. याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी स्वत: उदयकुमार रिपब्लिकच्या कार्यक्रमात उपस्थित होते. ‘अर्णब गोस्वामी इतके उत्तेजित झाले की त्यांनी मला बोलण्याची संधीच दिली नाही. अर्णब यांनी वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद होती,’ असेदेखील अर्णब गोस्वामी यांनी म्हटले.

एस. पी. उदय कुमार यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासोबत रिपब्लिकचे दोन प्रतिनिधी संजीव आणि श्वेता यांच्याविरोध तक्रार दाखल केली आहे. ‘संजीव आणि श्वेता यांनी मला फसवले आहे. त्यांच्याकडून माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातो आहे,’ असे उदय कुमार यांनी म्हटले आहे. याबद्दल उदय कुमार यांनी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे.