१९८४ च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अभिनेते अमिताभ बच्चन यांचीही साक्ष नोंदविली होती, अशी माहिती पुढे आली आहे. या दंगलींमध्ये कॉंग्रेस नेते जगदीश टायटलर यांनी साक्ष बदलण्यासाठी साक्षीदारांवर दबाव टाकला होता, असा आरोप झाल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने सीबीआयला त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच तपास बंद करीत असल्याचा (क्लोजर रिपोर्ट) अहवाल दाखल केला आहे.
दिल्लीचे अतिरिक्त मुख्य महादंडाधिकारी एस. पी. एस. लालेर यांनी सीबीआयला त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले. शीखविरोधी दंगलीतील पीडितांचे वकील एच. एस. फूलका यांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की, टायटलर यांनी या खटल्यातील प्रमुख साक्षीदार सुरिंदर कुमार ग्रंथी यांच्यासोबतचा करार मोडण्याचा प्रयत्न केला, ही माहिती व्यावसायिक अभिषेक वर्मा यांनी सीबीआयला दिली होती. सुरिंदर कुमार यांनी टायटलर यांच्याविरोधात साक्ष नोंदविली होती, असेही फूलका यांनी न्यायालयात सांगितले.