आयएनएस किल्टन ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबादेखील उपस्थित होते. आयएनएस किल्टनमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे. समुद्राखालून जाणाऱ्या पाणबुड्या उद्ध्वस्त करण्याची क्षमता आयएनएस किल्टनमध्ये आहे.

‘कमोरटा वर्गात चार युद्धनौका आहेत. यातील किल्टन ही तिसरी युद्धनौका आहे,’ असे नौदलाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘डायरेक्टोरेट ऑफ नेवल डिजाइनने किल्टनचे डिझाईन केले असून कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स ऍण्ड इंजीनियर्सकडून या युद्धनौकेची उभारणी करण्यात आली आहे,’ असेदेखील प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. ‘आता देश संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक स्वावलंबी होत आहे. किल्टनची निर्मिती ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत करण्यात आली आहे. देशाचे व्यापक हित लक्षात घेऊन आयएनएस किल्टनची उभारणी करण्यात आली आहे,’ असेही नौदलाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स ऍण्ड इंजीनियर्सने किल्टनची बांधणी केली आहे. शिवालिक श्रेणी, कोलकाता श्रेणी, आयएनएस कमोरटा आणि आयएनएस कदमात यांच्यानंतरची सर्वाधिक शक्तिशाली युद्धनौका म्हणून आयएनएस किल्टनचे नाव घेतले जाईल. आयएनएस किल्टनमध्ये घातक शस्त्रास्त्रांसह सेन्सर लावण्यात आले आहेत. आयएनएस किल्टनच्या बांधणीत फायबरचा वापर करण्यात आला आहे. याआधी कोणत्याही भारतीय युद्धनौकेच्या उभारणीत फायबरचा वापर झालेला नाही. फायबरच्या वापरामुळे युद्धनौकेचे वजन कमी होते. याशिवाय युद्धनौकेची देखभाल करणेदेखील सोपे जाते.