24 October 2017

News Flash

संघ आणि भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपवलं जातंय- राहुल गांधी

देशात केवळ एकच आवाज असला पाहिजे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

एएनआय | Updated: September 6, 2017 1:15 PM

Rahul Gandhi : मी गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोललो आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडा आणि शिक्षा करा, असे त्यांना सांगितल्याची माहिती राहुल यांनी दिली.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला. देशामध्ये सध्या संघ आणि भाजपविरोधात बोलणाऱ्यांना संपवलं जातंय, अशी टीका त्यांनी केली. जो कुणी संघाच्या किंवा भाजपच्या विचारसणीचा विरोध करत असेल त्याला धमकावले जाते, मारले जाते, त्याच्यावर हल्ला केला जातो आणि वेळ पडली तर त्या व्यक्तीला ठारही मारतात. या सगळ्यामागे देशात केवळ एकच आवाज असला पाहिजे, हेच उद्दिष्ट आहे. मात्र, ही आपल्या देशाची परंपरा नाही, असे राहुल यांनी म्हटले.

गौरी लंकेश हत्या प्रकरण: बंगळुरू पोलिसांकडून संशयित ताब्यात

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. लोक म्हणतात पंतप्रधान शांत राहतात, कशावरही प्रतिक्रिया देत नाहीत. एखाद्या मुद्द्यावरून दबाव खूपच वाढल्यानंतर पंतप्रधानांना वाटते की, आता आपण काहीतरी बोलायलाच पाहिजे. पंतप्रधान मोदी हे कसलेले हिंदू राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे दोन अर्थ असतात. एक अर्थ त्यांच्या विचारसरणीच्या लोकांसाठी असतो तर दुसरा अर्थ उर्वरित लोकांसाठी असतो, असे राहुल यांनी सांगितले. दरम्यान, मी गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोललो आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडा आणि शिक्षा करा, असे त्यांना सांगितल्याची माहिती राहुल यांनी दिली.

सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची मंगळवारी बंगळुरू येथे हत्या करण्यात आली. त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

First Published on September 6, 2017 1:15 pm

Web Title: anybody who speaks against ideology of bjp rss is pressured even killed says rahul gandhi