अॅपलने आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स लाँच केला आहे. यानंतर लगेचच कंपनीकडून अपेक्षेप्रमाणे जुन्या आयफोन्सच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. अॅपलकडून नवे फोन लाँच करण्यात आल्यानंतर जुन्या फोन्सच्या किमतींमध्ये घट केली जाते. यानुसार आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

अॅपलकडून आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स लाँच झाल्यावर जुन्या फोन्सच्या किमती कमी होतील, असा अंदाज होता. आयफोन ७, आयफोन ६ खरेदी करण्यासाठी अनेकजण आयफोन ८, आयफोन ८ प्लसची वाट पाहत होते. या आयफोनप्रेमींना त्यांच्या संयमाचे फळ मिळणार आहे. आयफोन ७ (३२ जीबी) च्या किमतीत ७ हजारांची घट झाली आहे. आधी ५६ हजार २०० रुपयांना मिळणारा आयफोन ७ आता ४९ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

आयफोन ७ प्लसच्या (३२ जीबी) किमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे. आधी ६७ हजार ३०० रुपयांना मिळणारा आयफोन ७ प्लस आता ५९ हजार रुपयांना खरेदी करता येईल. आधी ६५ हजार २०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन ७ (१२८ जीबी) ची किंमत आता ५८ हजार रुपये इतकी झाली आहे. तर आधी ७६ हजार २०० रुपयांना उपलब्ध असलेला आयफोन ७ प्लस (१२८ जीबी) आता ६८ हजार रुपयांना विकत घेता येईल.

आयफोन ७ सोबतच आयफोन ६ मालिकेतील फोन्सच्या किमतींमध्ये मोठी कपात झाली आहे. आयफोन ६ एस प्लसची (३२ जीबी) किंमत ५६ हजार १०० रुपये होती. आता त्यामध्ये ७ हजारांची घट झाली आहे. त्यामुळे हा फोन ४९ हजारांना खरेदी करता येणार आहे. तर ६५ हजारांचा आयफोन ६ एस प्लस (१२८ जीबी) आता ५८ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. आयफोन ६ एसच्या (३२ जीबी) किमतींमध्येही मोठी घसरण झाली आहे. आधी ४६ हजार ९०० रुपयांना मिळणारा हा फोन आता ४० हजार रुपयांत खरेदी करता येईल. तर आयफोन ६ एस (१२८ जीबी) ची किंमत ५५ हजार ९०० रुपयांवरुन ४९ हजार रुपयांवर आली आहे.