एखाद्या नव्या उत्पादनाऐवजी अ‍ॅपलने मंगळवारी आयपॅडचे दोन सुधारित मॉडेल्स आणि वेगवान मॅक काम्प्युटर बाजारात आणले. अ‍ॅपलच्या या सुधारित मॉडेल्सनंतर कंपनीचे शेअर्स अमेरिकेमध्ये ०.३ टक्क्यांनी खाली आले.
अ‍ॅपलने सादर केलेल्या सुधारित मॉडेल्समध्ये आयपॅड एअर हा विशेष लक्षवेधक ठरला. आयपॅड ४पेक्षा हा नवा आयपॅ़ड २० टक्क्यांनी कमी जाड आहे. त्याचबरोबर त्याचे वजनही २८ टक्क्यांनी कमी आहे. या आयपॅडचा डिस्प्ले ९.७ इंच इतका आहे. आयफोन ५ एसमध्ये वापरण्यात आलेला एम७ मोशन प्रोसेसर या आयपॅडमध्ये वापरण्यात आला आहे. त्यामुळे आधीच्या आयपॅडच्या तुलनेत याची गती दुपटीने वाढणार आहे. या सुधारित आयपॅडची बॅटरी दहा तास चालेल इतकीच देण्यात आली आहे. वजन कमी असल्यामुळे आणि जाडी आणखी कमी करण्यात आल्यामुळे हा आयपॅड अधिक आकर्षक आणि हाताळण्यास सुटसुटीत झाला आहे.
अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वी आयपॅड मिनी बाजारात आणला होता. हाच आयपॅड मिनी आता रेटिना डिस्प्लेमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आयपॅड मिनीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. पुढील महिन्यापासून हे सुधारित मॉडेल्स बाजारात येणार आहेत. आयपॅड एअर स्पेस ग्रे आणि सिल्व्हर या दोन रंगात तो मिळणार आहे. आयपॅड एअरची १६ जीबीसाठी ४९९ डॉलर, ३२ जीबीसाठी ५९९ डॉलर, ६४ जीबीसाठी ६९९ डॉलर अशी किंमत आहे.