आयुष्यात एकदा तरी आयफोन वापरुन पाहावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयुष्यात एकदा आयफोन वापरलेली व्यक्ती त्यानंतर दुसऱ्या कंपनीचा मोबाईल वापरत नाही, असंदेखील म्हटलं जातं. आयफोन वापरणाऱ्या आणि आर्थिक कारणांमुळे तो न वापरु शकणाऱ्या, अशा दोन्ही वर्गांमध्ये अॅपलच्या नव्या फोन्सविषयी सारखीच उत्सुकता असते. आयफोन्ससोबतच त्याच्या किमतींचीही तितकीच चर्चा होताना दिसते. आयफोन ७ बाजारात येऊन बराच कालावधी झाल्यानंतर आता पुढील फोनची म्हणजेच आयफोन ८ ची चर्चा सुरु झाली आहे.

अॅपलचा नवा फोन नव्या वैशिष्टांमुळे कायम चर्चेत असतो. आयफोन ८ ची चर्चा त्यामधील नेक्स्ट जनरेशन ओलईडी स्क्रिनमुळे सुरु झाली आहे. यासोबतच नव्या फोनचे डिझाईवन कसे असेल, यावरदेखील चर्चा सुरु आहे. यासोबतच आयफोन ८ ची किंमत किती असेल, याबद्दलही अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. वॉल स्ट्रिटचे अॅनलिस्ट स्टिवन मिलुनोविच यांनी आयफोन ८ ची किंमत ८७० अमेरिकन डॉलरपासून सुरु होईल, असा अंदाज वर्तवला आहे. आयफोन ८ मधील २५६ जीबीचे व्हर्जन १ हजार ७० अमेरिकन डॉलरला उपलब्ध असेल, असेदेखील स्टिवन मिलुनोविच यांनी म्हटले आहे.

स्टिवन मिलुनोविच यांच्याआधीही काही अॅनलिस्टनी आयफोन ८ ची किंमत १ हजार अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक असेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र १ हजार डॉलरला आयफोन ८ चे सर्वाधिक महागडे व्हर्जन बाजारात उपलब्ध असेल, असा अंदाज स्टिवन मिलुनोविच यांवी वर्तवला आहे. याआधी इतर अॅनलिस्टनी आयफोन ८ मधील बेसिक मॉडेल्सची किंमतच १ हजार अमेरिकन डॉलरपासून सुरु होईल, असे म्हटले होते.

आयफोन ८ मध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल, असा अंदाज अॅनालिस्ट स्टिवन मिलुनोविच यांनी वर्तवला आहे. यासोबतच इज-टू-इज स्क्रिन हेदेखील आयफोन ८ चे वैशिष्ट असेल, असे मिलुनोविच यांनी म्हटले आहे. आयफोन ८ च्या आधी अॅपलकडून आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसचे अपडेटेड मॉडेल्स बाजारात आणण्यात येणार असल्याचीदेखील जोरदार चर्चा आहे.