भारतात आजपासून GST अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू झाला आहे. ज्यानंतर अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या मोबाईल, मॅकबुक आणि अॅपल वॉचच्या किंमती घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आयफोन ७, आयफोन ७ प्लस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन ६ एस आणि आयफोन एसई यांच्या किंमती घटल्या असल्याचे अॅपलने सांगितले आहे. तसेच १०.५ इंचाचा आयपॅड प्रो, १२.९ इंचांचा आयपॅड प्रो, आय पॅड आणि आय पॅड ४ यांच्याही किंमती घटल्या आहेत.

आयफोन ७ (३२ जीबी) ची किंमत लाँच झाल्यावर ६० हजार रूपये इतकी होती, GST नंतर ही किंमत ५६ हजार २०० रूपये झाली आहे. १२८ जीबी आणि २५६ जीबी मेमरीचे आयफोन ७ हे आता अनुक्रमे ६५ हजार २०० आणि ७४ हजार ४०० रूपयांना मिळणार आहेत. हे भारतात लाँच झाले तेव्हा त्यांची किंमत ही ७० हजार आणि ८० हजार अशी होती. तर आयफोन ७ प्लस (३२ जीबी) ६७ हजार ३०० रूपयांना मिळणार आहे, याची किंमत ७२ हजार रूपये होती. तर आयफोन प्लस (१२८ जीबी) हा आता ७६ हजार रूपयांना तर २५६ जीबीचा आयफोन प्लस हा ८५ हजार ४०० रूपयांना मिळणार आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी या दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे ८२ हजार आणि ९२ हजार इतकी होती.
त्याचसोबत आयफोन ६ एसच्या किंमतीही घटल्या आहेत. ३२ जीबी आणि १२८ जीबीचा आयफोन ६ एस हा आता अनुक्रमे ४६ हजार ९०० आणि ५५ हजार ९०० रूपयांना मिळणार आहे. जीएसटीपूर्वी या दोन्ही मॉडेलची किंमत ही अनुक्रमे ५० हजार आणि ६० हजार रूपये इतकी होती. तर आयफोन एसई ३२ जीबीचा फोन २६ हजार ६०० रूपयांना मिळणार आहे आणि १२८ जीबीचे मॉडेल ३५ हजारांना मिळणार आहे. यापूर्वी या दोन्ही मॉडेलची किंमत अनुक्रमे २७ हजार २०० आणि ३७ हजार २०० होती.

आय पॅडच्या किंमतीही घटल्या आहेत. १०.५ इंचांचा ६४ जीबींचा आयपॅड ५० हजार ८०० रूपयांना मिळू शकणार आहे. त्याची किंमत जीएसटी आधी ५२ हजार ९०० इतकी होती. तर २५६ जीबीचे मॉडेल आता ५८ हजार ३०० रूपयांना मिळणार आहे. याची आधीची किंमत ६० हजार ९०० इतकी होती. तर ५१२ जीबीचे मॉडेल आता ७३ हजार ९०० रूपयांना उपलब्ध होणार आहे. याची जीएसटीची किंमत ७६ हजार ९०० रूपये इतकी होती.

अॅपल वॉचच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. सीरिज १ मधल्या अॅपल वॉचची किंमत २२ हजार ९०० रूपये झाली आहे, जीएसटी पूर्वी ही किंमत २३ हजार ९०० रूपये होती. तर सीरिज २ मधले अॅपल वॉच आता ३१ हजार ९०० रूपयांना मिळणार आहे, ज्याची किंमत सुरूवातीला ३२ हजार ९०० रूपये होती. जीएसटी लागू झाल्यानंतर या नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत. अॅपल कंपनीचे गॅजेट्स वापरणाऱ्या वर्गासाठी ही खुशखबरच ठरली आहे.