गॅलेक्सी नोट ७ च्या सदोष बॅटरीमुळे सॅमसंगची जगभरात नाचक्की झाली असतानाच आता आयफोन ७ ची बॅटरीही सदोष असल्याचा दावा केला जात आहे. ऑस्ट्रोलियातील एका तरुणाने आयफोन ७ ने पेट घेतल्याचा दावा केला असून अॅपलनेही या घटनेचा तपास सुरु केला आहे.

ऑस्ट्रेलियात राहणा-या मेट जॉन्स याने नुकताच लाँच झालेला आयफोन ७ हा मोबाइल घेतला होता. मेट जॉन्स हा कामानिमित्त जात होता. कामावार जात असताना त्याने आयफोन ७ गाडीमध्ये ठेवला होता. जॉन्स कामावरुन गाडीजवळ परतला असता गाडीच्या काचा काळ्या झाल्याचे दिसले. त्याने तातडीने दरवाजा उघडला असता आयफोन ठेवलेल्या सीटने पेट घेतल्याचे आढळले. आयफोन ७ मुळेच सीट आणि तिकडे ठेवलेल्या कपड्यांनी पेट घेतला असा जॉन्सचा आरोप आहे. माझा मोबाईल वितळला होता असेही जॉन्सने सांगितले. अॅपलनेही या घटनेची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र जॉन्सने दिलेले छायाचित्र बघून आगीसाठी आयफोन कारणीभूत असल्याचे दिसत नाही असा प्राथमिक अंदाजही जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सदोष बॅटरीमुळे सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट ७ या फोनने पेट घेतल्याचे घडले होते. नोट ७ ने पेट घेतल्याच्या जगभरात ३५ हून  अधिक घटना घडल्या होत्या. यासाठी सॅमसंगने ठराविक कंपनीतून तयार केलेल्या बॅटरींना जबाबदार ठरवले होते.  सॅमसंगने २५ लाखांहून अधिक नोट ७ फोन परत मागवले होते. सॅमसंगने ग्राहकांना हे फोन बदलूनही दिले होते. पण बदलून दिलेल्या फोनमधील बॅटरीही सदोष निघाली आणि शेवटी सॅमसंगने नोट ७ चे उत्पादन कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला. नोट ७ मुळे सॅमसंगची नाचक्की झाली असून सॅमसंगला यामुळे आर्थिक फटकाही बसला आहे.  नोट ७ च्या घटनेतून बोध घेत आता आयफोन या प्रकरणाला कसे हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका युवकाने आयफोन ७ प्लस कुरिअरने मागवला होता. त्याच्या फोननेही पेट घेतला होता. पण कुरिअर दरम्यान फोन चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला असावा अशी शक्यताही वर्तवली जात होती.