दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘अॅपल’कडून सप्टेंबरमध्ये आपल्या उत्पादनांची नवी मॉडेल्स बाजारात उपलब्ध करून देण्यासंबंधीची घोषणा होणार असून, यामध्ये ‘आयफोन ७’ ही लाँच केला जाऊ शकतो. अॅपलने सात सप्टेंबरला अमेरिकेत नेहमीप्रमाणे एक कार्यक्रम आयोजित केला असून, त्यामध्ये कंपनीच्या नव्या उत्पादनांबद्दल माहिती दिली जाणार आहे. अॅपलने अधिकृतपणे आयफोन ७ बद्दल कोणतीही माहिती दिलेली नसली, तरी हा कार्यक्रम सात सप्टेंबरला आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी निमंत्रणामध्ये कंपनीने केवळ See you on the 7th एवढाच मजकूर लिहिण्यात आलेला आहे. मात्र, कंपनी यावेळी आयफोन ७ प्रदर्शित करेल आणि त्यातील वेगवेगळ्या सुविधांबद्दल माहिती दिली जाईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून समजते. या कार्यक्रमामध्ये आयफोनसोबतच नव्या अॅपल वॉचचीही घोषणा केली जाऊ शकते.
अॅपलच्या नव्या उत्पादनांची माहिती दरवर्षी सप्टेंबरमध्येच केली जाते. सलग पाच वर्षे कंपनीकडून याच महिन्यात नव्या उत्पादनांबद्दल माहिती दिली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन ७ आतापर्यंतच्या आयफोनच्या मॉडेल्सपेक्षा अधिक स्लीम असेल. यासाठी नव्या मॉडेलमधून ऑडिओ जॅकही काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे ग्राहकांना वायरलेस हेडफोन्स घ्यावे लागू शकतात. यापेक्षा नव्या मॉडेलमध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला नाही. आयफोन ६ सारखेच नवे मॉडेल असेल, अशी माहिती मिळाली आहे. पाण्यापासून बचाव करण्यासाठी नवे मॉडेल अधिक सुसज्ज असेल, असेही समजते. १६ जीबीचे आयफोन मॉडेल बंद होईल, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. त्याप्रमाणे नवे मॉडेल हे १६ जीबीमध्ये उपलब्ध होणार नाही. नवे मॉडेल थेट ३२ जीबीमध्ये उपलब्ध असेल, अशीही माहिती मिळाली आहे.
अॅपल वॉचचे पहिले मॉडले बाजारात येऊन दीड वर्षे झाले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात अॅपल वॉचचे नवे मॉडेल उपस्थितांना दाखविण्यात येऊ शकते. नव्या मॉडेलच्या डिझाईन्समध्ये फार बदल होणार नाहीत. फक्त त्यामध्ये कॅमेराही असू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.