बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीत कुरबुरी सुरू झाल्या असल्याच्या भाजपच्या टीकेवर राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम कारभार करीत असून हे सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील, असा विश्वास लालूप्रसाद यांनी व्यक्त केला आहे.
दरभंगा येथे दोन अभियंत्यांची करण्यात आलेली हत्या आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावरून राजद आणि जद(यू) मध्ये कुरबुरी सुरू झाल्या असल्याच्या वृत्ताचे लालूप्रसाद यांनी जोरदार खंडन केले.
निवडणुकीच्या वेळी जी आश्वासने देण्यात आली होती त्यांची पूर्तता करण्यासाठी नितीशकुमार सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे आणि प्रत्येक विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे, असेही ते म्हणाले. बिहारमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्याने भाजप खचला आहे आणि नैराश्यातूनच ते सरकार पडण्याची भाषा करीत आहेत, असेही ते म्हणाले.